Monday, July 12, 2021

आठवणींचा डोह

अगदी टिपिकल पावसाळ्याचा फील येतोय. आकाशात दाटून आलेल्या ढगांच्या गर्दीने  मनात कसलीशी हुरहुर दाटून येते. जुन्या आठवणींना उजाळा देत खिडकीबाहेर आकाशाकडे बघत रहावसं वाटतं. तिथे काहीही सापडणार नाही हे माहीत असूनही तिथेच काहीतरी सापडवण्याचा प्रयत्न करात रहावासा वाटतं. मधेच पोपटांचा  थवा टुई टुई करत नजरेपासनं दूर दूर सरकत जातोय. क्षितिजाजवळ कुठलिशी काजळी पसरलेली आहे आणि मनात कुठे तरी खोल अंधकार. आठवणींचा  डोह. काळाश्शार, गूढ़ आणि स्तब्ध. थोड्यावेळ तसंच उभं राहिलं की अगदी ताजंतवानं वाटतं आणि पुन्हा आपल्या कामाला सुरुवात होते. 

Saturday, April 18, 2020

वाघिणीची काय चूक होती ?

पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या  टिपेश्वरच्या वन्यजीव अभयारण्याच्या जंगलातील एक वाघीण जखमी झाली होती. फोटो मागवून घेतले तर मन सुन्न झाले. हरीण वर्गीय प्राण्यांना पकडण्यासाठी लावलेला फास वाघिणीच्या गळ्याला सला आणि त्यामुळे ती जखमी झाली होती. संध्याकाळी पाचच्या सुमारास ही बातमी कळाली तसे लगेच तयारीला लागलो. वाघिणीला बेशुद्ध करायचे औषध, इतर उपकरणे जमवून आणि सगळे सामान घेतल्याची खातरजमा करून घेतली .

सगळे सामान तयार करून नागपूरहून टिपेश्वरला जाण्यासाठी निघायला रात्रीचे  नऊ  वाजलेच. प्रवासात एका ठिकाणी जाम ला थांबून जेवण करून पुन्हा एकदा पुढच्या प्रवासाला लागलो. रात्री झोपेत केव्हातरी एक दिडच्या  सुमारास टिपेश्वर जंगलात प्रवेश केला आणि झोपेतच मन आनंदून गेलं. दिवसभराच्या घडामोडींमुळे प्रचंड  थकवा  आलेला होता त्यामुळे फक्त मनातल्या मनात जंगल अनुभवत टिपेश्वरला पोहोचलो.

रात्री पोहोचून लगेच ज्या भागात वाघीण सापडली त्या भागात पोहोचून पिंजरा लावण्याची व्यवस्था केली. तिथले वन परिक्षेत्र अधिकारी  ह्यांनी वन मजूर बोलावून ठेवले होते त्यामुळे पिंजरा लावायला मदत झाली. वाघ शक्यतो प्रलोभन पिंजऱ्यात येत नाही तरीदेखील प्रयत्न करायचे ठरले. सकाळी चार वाजे पर्यंत प्रलोभन पिंजरा लावणे आणि पुढची व्यवस्था करणे ह्यात वेळ गेला. सकाळी लवकर कामाला सुरुवात करायची असल्याने लगेच झोपायला गेलो तरीपण दुसऱ्या दिवसाची तयारी करून झोपायला साडे चार वाजले.

दोन तासाची झोप घेऊन सकाळी ६.३० वाजता उठून लगेच  पिंजरा लावला होता त्या नाल्यात उतरलो. सोबतीला गस्तीचे वनमजूर, वनरक्षक आणि माझे सोबती वनपरिक्षेत्र अधिकारी होतेच. कॅमेरामधले फोटो तपासले तर त्यात वाघिणीचे फोटो आलेले नव्हते. थोडक्यात वाघीण ह्या परिसरात आलेलीच नव्हती. जखमी वाघिणीला बेशुद्ध करून पकडायचे असेल तर ती बंदुकीच्या रेंजमध्ये येणे आवश्यक होते आणि इथे तर वाघीण दिसतही नव्हती आणि जवळपासच्या परिसरात फिरकत देखील नव्हती. काम कठीण होत जाणार होते ह्याची कल्पना असल्यामुळे मी अगदी जय्यत तयारी ठेवली होती आणि महिन्याभराच्या मुक्कामाच्या तयारीने सामान आणले होते



क्रमशः




Monday, February 29, 2016

सतराव्या वर्षी माझ्यावर बलात्कार झाला होता, त्याचा आज निकाल आहे

कधीतरी प्रकाश पाठारे ह्यांची एक कविता वपुंच्या 'आपण सारे अर्जुन' ह्या पुस्तकात वाचनात आली होती.

सत्तर वर्षांच्या म्हातारीला कोर्टाच्या पायरीवर बसलेली पाहून विचारलं, "आजी, आज इथं काय आहे?"
त्यावर तिनं उत्तर दिलं, "सतराव्या वर्षी माझ्यावर  बलात्कार झाला होता, त्याचा आज निकाल आहे."

बत्तीस न्यायाधीश, वीस वकील, चाळीस शिरस्तेदार बदलून गेले. 
निम्मे साक्षिदार मरून, तर बाकीचे केव्हाच  पळून गेले. 
कितीतरी बलात्कारित स्त्रिया मरून गेल्या.  मी मात्र जिवंत, हीच एक कमाल  आहे. 

भगवान के घर देर है … ही म्हण अजून बदललेली नाही. 
न्यायदेवतेच्या डोळ्यांवरची पट्टी थोडीसुद्धा  सरकली नाही. 
मोर्चे, आंदोलने तेव्हाही झाली, नंतर कुणी फिरकलं नाही,
तरीसुद्धा वाटतं, आज जीवनाची सकाळ आहे.
सतराव्या वर्षी माझ्यावर  बलात्कार झाला होता, त्याचा आज निकाल आहे.

थरथरत्या हाताला हात देऊन म्हातारीला उभं केलं. निकाल ऐकण्यासाठी चार भिंतींच्या आत नेलं .
निकाल ऐकून मात्र तिचे पाय लटपटू लागले. पुराव्याअभावी काही आरोपी निर्दोष सुटून  गेले.
ज्यांना शिक्षा झाली , ते  तर कधीच मरून गेले.
सत्तर वर्षांच्या आयुष्याचा आज सारा निकाल आहे .
सतराव्या वर्षी झालेल्या  बलात्कारावर हा न्यायालयाचा अजून एक बलात्कार आहे.. 

Friday, May 15, 2015

मन उधाण वाऱ्याचे

Add caption

मार्च एप्रिल महिन्यापासनं जंगलाच्या सभोवताल पळस बहरलाय. जंगलात प्रवेश करण्याच्या  भरपूर आधी प्रवासातच हा वाटेकरी आपले स्वागत करत अन रंगांची उधळण करत आयुष्य कसं जगावं ह्याची शिकवण देताना दिसून येतो. किती दिवसांचंच ते बहरणं पण वर्षभर हया सौंदर्याची उधळण डोळ्यात साठवून असते.

मनात येतं, आपल्याला असं  आयुष्य जगता येईल ? स्वतः कडे जे जे काही आहे ते ते सगळं उधळून टाकायचं आणि रिती झोळी घेऊन तटस्थपणे जीवनाकडे बघायचं.

परमेश्वराकडे काही मागावंसं वाटलं तर असं आयुष्य जगण्याची कला अंगी दे आणि तसं करण्याचं बळ दे, एवढंच मी मागेन.

Sunday, February 8, 2015

राधिका

तुम बिन हथेली की हर लकीर प्यासी है !
तीर पार कान्हा से दूर राधिका-सी है !!

श्याम की उदासी में याद संग खेला है !
कुछ गलत न कर बैठे मन बहूत अकेला है  !!

औषधी चली आओ चोट का निमंत्रण है !
बासूरी चली आओ होठ का निमंत्रण है !!

कुमार विश्वासची ही रचना आहे बहुतेक. ओळी वाचताना डोळ्यात खोल कुठेतरी संध्याकाळचा एखादा प्रसंग आठवतो आणि आपण कुठेतरी खोल शून्यात हरवतो.

एखाद्या सांजवेळी कशासाठी, कोणासाठी आणि आणखी किती दिवस असे अनेक प्रश्न मनात डोकावू लागतात. आपण जे कार्य हाती घेतले आहे ते करताना कधी खरंच एकाकी वाटायला लागतं आणि अशा कवितेच्या ओळी मदतीला धावून येतात.


Wednesday, September 7, 2011

आकाशाचा बादशहा

 तो मनमौजी आह़े त्याला आकाशात मुक्तसंचार करायला आवडते. मोकळे जंगल वास्तव्यासाठी त्याला आवडत असले तरी शहरी वातावरणाशीदेखील त्याने व्यवस्थित जुळवून घेतलंय.  भक्ष्याला पकडण्यासाठी ताकदीपेक्षा भन्नाट वेगाचा तो जाणीवपूर्वक उपयोग करतो कारण, वेग हीच त्याची खरी ताकद आह़े तो वेगाचा राजा आहे. म्हणूनच ‘आकाशाचा बादशहा’ आह़े.

_____________________________________________________
 
लोकसत्तामध्ये प्रकाशित झालेला "आकाशाचा बादशहा" हा आठवा लेख वाचण्याकरिता कृपया खालील लिंकवर click करा.

http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=61566:2010-04-10-20-01-49&catid=97:2009-08-04-09-03-27&Itemid=109

Monday, September 5, 2011

अस्तित्वाची लढाई

अचानक माकडांचा गलका वाढला. लहान पिल्लांच्या चि..चि.. आवाजातली भीती स्पष्टपणे जाणवू लागली. मी दचकून जागा झालो. समोर काहीतरी भयंकर असं थरारनाट्य घडत असल्याची जाणीव झाली. उठून झाडाखाली बसून राहिलो. पण, माकडांचं माझ्याकडं अजिबातच लक्ष नव्हतं.

रंग्याचं नेतृत्व अमान्य करून टोळीतल्या तरुण नर माकडांनी टोळीचा नायक ‘रंग्या’ विरुद्ध बंड पुकारलं असावं आणि रंग्या त्या माकडांना दडपशाहीच्या मार्गाने प्रतिआक्रमण करून प्रत्युत्तर देत असावा असं मला वाटलं पण, माझा अंदाज साफ चुकला होता. रंग्याच्या टोळीवर दुसऱ्या टोळीतल्या काही तरुण नरांनी आक्रमण केलं होतं.
____________________________________________________________

 
लोकसत्तामध्ये प्रकाशित झालेला "अस्तित्वाची लढाई" हा सातवा लेख वाचण्याकरिता कृपया खालील लिंकवर click करा.

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=58028:2010-03-27-18-21-19&catid=97:2009-08-04-09-03-27&Itemid=109